पोलीस महासंचालकांना दरोडेखोरांनी दिली गोळीबार करून ‘सलामी’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – कोकणे चौकातील एका सराफी पेढीवर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून दुकानातील लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराहट पसरली आहे. गोळीबाराच्या घटनेत सराफ जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिव्यांक प्रदीप मेहता (वय २५, रा. आर्य वेदांत रेसिडेन्सी, रहाटणी, पुणे) असे गोळीबारात जखमी झालेल्या ज्वेलर्सचे नाव आहे. राज्याचे पोलीस माहसंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे आज प्रथमच पुणे दौऱ्यावर असताना दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून त्यांना एकप्रकारे सलामीच दिली आहे. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली.

 

कोकणे चौकातील सराफी पेढीवर दरोडा पडल्याची घटना समजताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याच्या दागिन्यांसह दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरुन नेला आहे. यामुळे दरोडेखोरांना शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे.

कोकणे चौकात आकाशगंगा सोसायटीतील सराफावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. सोनाराला लुटण्याच्या हेतूने हा गोळीबार केला असल्याचे बोलले जात आहे. कोकणे चौकात असलेल्या पुणेकर ज्वेलर्स मध्ये घुसून गोळीबार करण्यात आलेला आहे. यामध्ये सराफाच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. चोरट्यांनी दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले आहे. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी सराफ दुकानात घुसून गोळीबार झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांचे पथके दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

पिंपरी चिंचवडमधील गुन्ह्येगारी वाढत असून नव्याने सुरु झालेल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामुळे गुन्हेगारी कमी होईल असे वाटत होते. मात्र, गुन्हेगारी आणखीच वाढत चालली आहे. आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांवर कायद्याचा बडगा उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पोलिसांकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नसल्याचे हे आजचे ताजे उदाहरण आहे.

पुणे \ पिंपरी : कोकणे चौकात सराफावर भरदिवसा गोळीबार