महामार्गावर वाकड येथे तरुणावर गोळीबार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई बेंगलोर महामार्गावरील वाकड येथील हॉटेल कोल्हापुरी येथे सिगारेट घेण्यासाठी उतरलेल्या तरुणावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली आहे. गोळीबार करणारे फरार झाले असून पोलीस शोध घेत आहेत. हरिओम मेहरसिंग सिंग (३०, रा. रा. सुतारवाडी, पाषाण. मुळगाव राजस्थान) याच्यावर गोळीबार झाला असून तो जखमी झाला आहे. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम हा रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावरील वाकड येथील हॉटेल कोल्हापुरी येथे पानटपरीवर सिगारेट घेण्यासाठी थांबला होता. त्यावेळी तिघेजण तिथे आले.

हरिओम हा सिगारेट घेऊन पुन्हा मोटारीत आला असता मोटारीत बसलेल्यानी त्याच्या पोटाला पिस्तूल लावले आणि मोटार पुढे घेण्यास सांगितले. त्यावेळी  हरिओम याने ‘काय झाले?’ अशी विचारणा केली. त्यापैकी एकाने ‘तुला मारायचे आहे काय,’ असे म्हटले. यामुळे घाबरलेल्या हरिओम याने मोटारीतून उतरून हॉटेलच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी एकाने  हरिओम याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात हरिओम याच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाले. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले.