धक्कादायक ! भरदिवसा सराफ व्यावसायिकाला जिवंत जाळले, 90 % भाजल्याने ‘गंभीर’

पोलिसनामा ऑनलाईन, फिरोजाबाद, दि. 19 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे सराफा व्यापार्‍याला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. फिरोजाबाद पोलीस स्टेशनच्या द्वारिकाधीश भागात हि घटना घडलीय. आगीत होरपळलेल्या या सराफा व्यापार्‍याने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, 90 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाला आहे. हि सर्व थरारक घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झालीय. जखमी सराफ व्यापार्‍याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

राकेश वर्मा असे जखमी सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. तर, त्याचा चुलतभावाने हे कृत्य केल्याचे पोलिस सांगत आहेत. पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, फिरोजाबाद येथील घंटघर कृष्णा पाडा येथील राहणारे राकेश वर्मा यांचे सराफी दुकान आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा एकाशी वाद झाला होता. मंगळवारी संध्याकाळी संतप्त संशयित आरोपी त्यांच्या दुकानात पोहोचला आणि थिनर अंगावर टाकून आग लावली. हा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्हीत कैद झालाय.

आग लावल्यानंतर संशयित आरोपीने तेथून पळ काढला.तर, राकेश वर्मा हे जीव वाचवण्यासाठी पळू लागले. स्वत: चा बचाव करण्यासाठी राकेश यांना पळताना बघून लोक घाबरले. आगीचा गोळा रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र दिसत होते. यामुळे बाजारपेठेमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यावेळी काहींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. तसेच याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

एसपी ग्रामीण राजेश कुमार हे देखील घटनास्थळी पोहोचले. जखमी राकेश यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी एसपी यांनी ग्रामस्थांनी सांगितले की, व्यावसायिकाला त्याच्या स्वत: च्या चुलत भावाने जाळल्याची माहिती मिळालीय.तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला जात आहे.