खळबळजनक ! प्रियकराचा लग्नाला नकार, त्याला फसवण्यासाठी तरुणीने केला स्वतःच्या लहान बहिणीचा खून

फिरोजाबाद (यूपी) : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक सहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना मुलीचा मृतदेह गावातील एका तलावात आढळून आला. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता, खळबजनक माहिती समोर आली. मयत मुलीच्या सावत्र बहिणीने आपल्या प्रियकराला फसवण्यासाठी चिमुकलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.

आरोपी तरुणीचे गावातील एका तरुणावर प्रेम होते. त्याच्यासोबत तिला लग्न करायचे होते. मात्र, तरुण विवाहीत असल्याने त्याने लग्नाला नकार दिला. त्यामुळे आरोपी तरुणीने प्रियकराला फसवण्याचा प्लॅन आखला. प्रियकराला फसवण्यासाठी तिने आपल्या सहा वर्षांच्या सावत्र बहिणीचा खून केला. प्रियकराला फसवण्याच्या नादात तीच पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

शोकोहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मंगळवारी सहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. बेपत्ता झालेल्या मुलीच्या घराच्या दरवाजावर एक चिठ्ठी लिहून चिकटवण्यात आली होती. यामध्ये लिहिले होते की, मुलीच्या मोठ्या बहिणीसोबत माझे लग्न लावून दिले नाही तर तिचा खून करेन. कुटुंबाला ही चिठ्ठी मिळताच गावात एकच खळबळ उडाली. मुलीचा शोध घेत असताना मंगळवारी रात्री उशिरा बेपत्ता मुलीचा मृतदेह गावातीलच एका तलावात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मृत मुलीच्या मोठ्या बहिणीकडे कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने गुन्हा कबूल केला. पोलीस अधिकारी कुमार पांडे यांनी सांगितले की, आरोपी तरुणीने सांगितले की, तिला गावातीलच एका तरुणासोबत लग्न करायचे होते. पण तो विवाहित होता. त्यामुळे तो तयार नव्हता. त्यामुळे मी त्याला फसवण्यासाठी लहान बहिणीचा खून केला. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली असून, तिची रवानगी तुरुंगात केली आहे.