आधी Facebook वरून मैत्री नंतर WhatsApp वर अश्लिल व्हिडीओ चॅट अन् त्यानंतर ब्लॅकमेलचा फोन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांकडून तरुणांना लैंगिक आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. फेसबुकवर अचानक अनोळखी महिलेची रिक्वेस्ट येते. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर चॅटिंग होते, फेसबुकवरची ही चॅटिंग पोहोचते थेट व्हॉट्सअपपर्यंत. आधी सहज बोलणे होते. ऑडिओ कॉलनंतर व्हिडीओ कॉल केले जातात. या व्हिडीओ कॉलवर तरुणाला अश्लील कृत्य करण्यासाठी उत्तेजित केले जाते आणि नंतर तेच व्हिडीओ पाठवून त्याला ब्लॅकमेल केले जाते. सोलापुरातील जवळपास 3 ते 4 तरुणांची अशी फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आपल्या इज्जतीला घाबरून कोणीही पुढे यायला धजावत नाही. सामाजिक कार्यकर्ते असलेल्या राज सलगर याने यासंदर्भात फेसबुक पोस्ट टाकली आणि जाळ्यात ओढला जाणारा एक तरुण समोर आला आणि त्याने संपूर्ण व्यथा मांडली.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या तरुणाला ब्लॅकमेलचे कॉल येत आहेत. सुदैवाने ह्या तरुणाने अद्याप कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना भीक घातली नाही. मात्र, या धमक्यांना कोणी बळी पडलेय का ? हे समोर येऊ शकलेल नाही. सायबर गुन्हेगारीच्या विश्वात रोज नवनवीन गुन्हे घडत आहेत. यंत्रणासमोर या गुन्हेगारीला आळा घालण्याचे एक मोठे आव्हान आहे. मात्र, व्हर्च्युअल जमान्यात जगत असताना सावध राहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जर अशी आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच थेट पोलिसात धाव घ्यावी.