COVID-19 : सर्वप्रथम ‘या’ महिलेला देण्यात आलं होतं ‘कोरोना’ वॅक्सीन, 16 आठवडयानंतर तिनं ‘हे’ सांगितलं, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  अमेरिकेत कोरोना विषाणूची लस लावणाऱ्या पहिल्या महिलेने आपले अनुभव शेअर केले आहे. लस अभ्यासाच्या पहिल्या फेरीत, 43 वर्षीय जेनिफर हॉलरला मार्चमध्ये लसीचा डोस देण्यात आला. 16 आठवड्यांनंतरही, जेनिफरच्या शरीरावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडल्याचे दिसले नाही. अमेरिकेच्या सिएटलमधील रहिवासी असलेल्या जेनिफरने म्हटले आहे की, तिला बर्‍यापैकी चांगले वाटत आहे.

जेनिफर हॉलरला कोरोनाची mRNA-1273 नावाची लस देण्यात आली होती. अमेरिकेच्या केपी वॉशिंग्टन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या लसीबाबत अभ्यास केला जात आहे. कोमो न्यूज ऑफ अमेरिकेच्या अहवालानुसार, एका टेक कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या जेनिफरच्या शरीरावर या लसीचा कोणताही दुष्परिणाम झाला नाही. mRNA-1273 लस यूएसच्या राष्ट्रीय आरोग्य संस्था आणि मॉडर्ना कंपनीने तयार केली आहे.

या लसीमुळे कोणालाही कोरोना संक्रमण होऊ शकत नाही असे कंपनीचे म्हणणे आहे कारण त्यामध्ये कोरोना विषाणू नसतो. 18 मे रोजी, मॉडर्नाने जाहीर केले की, फेज 1 चा चाचणी निकाल सकारात्मक लागला आहे. जुलैमध्ये लसीचा फेज-3 चा अभ्यास सुरू होईल, असेही मोडर्ना यांनी आपल्या लसीबद्दल सांगितले होते. तिसर्‍या फेरीत 30 हजार लोकांना लस देण्याचे नियोजन आहे.