Pune News : जिल्हयात पहिला ‘बर्ड फ्लू’चा विषाणू आढळला, नांदेमध्ये 300 पेक्षा जास्त कोंबडया करणार नष्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नांदे येथे कोंबड्यांमध्ये पहिला बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पोल्ट्रीतील सुमारे तीनशेहून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सूस-नांदे येथील एका कुटूंबाने पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरु केला होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्या पोल्ट्रीतील दररोज तीन ते चार कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागल्याने, मृत कोंबड्यांची तपासणी पुण्यातील औंध शाळेत करुन घेतली. मात्र, त्यात बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला नाही. तरीही नमुने तपासणीसाठी भोपाळ मधील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठवले. शुक्रवारी (१५) रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नांदे परिसरातील संसर्ग झालेल्या सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

नांदे परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना सूचना देण्याचे काम सुरु आहे. जेसीबीच्या मदतीने खड्डा घेऊन बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

– माजी सरपंच प्रशांत रानवडे

नांदे येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे आढळून आल्याने परिसरातील संसर्ग झालेल्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावली जाईल. त्याचसोबत दहा किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची खरेदी, विक्रीवर तात्काळ बंदी करण्यात येणार आहे.

– जिल्हा पशूसंवर्धन अधिकार डॉ. शिवाजी विधाते