शेतकऱ्यांसाठी दोन दिवसात मोठा निर्णय, CM उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे मला शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करायची नाही. त्यासाठी आजवर झालेल्या मदतीची संपूर्ण माहिती मागवण्यात आली असून येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आजपर्यंत काय काय घडलं आहे? शेतकऱ्यांना काय मदत मिळाली? मिळाली कि नाही मिळाली? काहींना कर्जमाफीची पत्रं मिळाली आहेत. मात्र कर्जमाफी दिलेली नाही. मला वास्तव जाणून घ्यायचं आहे. घोषणांचा पाऊस झाला आहे. पदरात काही पडलेलं नाही हे आम्हाला समजलं आहे. असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. आज झालेल्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकिमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारचा पहिला निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नवीन सरकारची पहिली कॅबिनेट बैठक सह्याद्री अतिथिगृहामध्ये पार पडली. या बैठकीला नवनिर्वाचित मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत उपस्थित होते.

Visit : Policenama.com