Coronavirus : मुंबईत ‘प्लाझ्मा’ थेरपी केलेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलया प्लाझ्मा थेरेपीच्याा रुग्णाचा मृत्यू झाला आहेे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांवर रक्तद्रव उपचाराचा (प्लाझ्मा थेरपी) प्रयोग प्रथमच शनिवारी लीलावती रुग्णालयातील 52 वर्षीय रुग्णावर करण्यात आला होता. त्या रुग्णाचा अखेर आज मृत्यू झाला.

ताप, सर्दी आणि फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने 52 वर्षीय रुग्णाला 20 एप्रिलला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचण्यांमध्ये त्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवरही ठेवण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालयानं पालिकेकडे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्याची परवानगी मागितली होती. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी हे उपचार केले जात असल्याने पालिकेने प्लाझ्मा थेरेपी देण्यास मंजुरी दिली.

त्यानुसार शनिवारी नायर रुग्णालयात कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी दान केलेले प्लाझ्मा लीलावती रुग्णालयाला देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्या रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. आज अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कॉनव्हॅलसंट प्लाझ्मामध्ये करोना व्हायरसमधून बर्‍या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीज असलेले रक्त काढून ते कोरोनाग्रस्त रुग्णांवर वापरले जाते. कोरोनाचे रुग्ण या नव्या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असून ही उपचार पद्धती लागू पडत असल्याचे अमेरिकन जर्नलमध्ये म्हटले आहे.