मुंबईत उभारलं देशातील पहिलं कोव्हिड केअर ‘आश्रम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून रुग्णांवर उपचारांसाठी मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी कोव्हिड सेंटर उभारण्यात येत आले आहेत. मुंबईत देशातील पहिलं कोव्हिड केअर आश्रम उभारण्यात आलं आहे. या आश्रमामध्ये 70 खाटां असून मुंबई पोर्ट ट्रस्टनं हे आश्रम उभारले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाच्या परिसरात जवळपास दोन एकरात हे आश्रम बांधण्यात आले आहे.

आश्रमामध्ये औषधांबरोबरच योग साधनेच्या माध्यमातूनही रुग्णांवर उपचार होत आहेत. योग, ध्यान, प्रवचन, नामस्मरण या उपयांनीही रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या या पहिल्या आश्रमात कोरोना संसर्ग झालेल्या 50 वर्षाखालील रुग्णांवर उपचार केले जातात, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. कोरोनामुक्त करण्यासाठी आश्रमाच्या संचालकांनी रुग्णांची दिनचर्या निश्चित केली आहे. रुग्णांना रोज एक तास योग, 90 मिनिटे ध्यान आणि जवळपास अर्धा तास अध्यात्मिक चर्चा करण्यात येणार आहे.

ऑनलाईन योगासने
रुग्णांना योग सुविधा मिळाव्यात यासाठी या आश्रमाचं निर्माण केले आहे. सर्व खोल्यामध्ये सूर्याचा प्रकाश योग्य येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णांसाठी बेड, खुर्ची आणि पंखा याची व्यवस्था केली आहे. योगासनांसाठी विशेष हॉलही तयार करण्यात आला आहे. व्हिडीओच्या माध्यमातूनही योगा शिवकवण्याची व्यवस्था केली आहे. व्हिडीओ आणि ऑनलाइन पद्धतीने रुग्णांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे.

आश्रमाचे नियम
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयांवर भार वाढत चालला आहे. हा वाढता भार कमी करण्यासाठी या आश्रमाची उभारणी करण्यात आली आहे. योग, काढा आणि ध्यान याबरोबरच कोरोना रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच आश्रमात कोरोना रुग्णांना त्यांनी घरून आणलेले कपडे वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.