Video : तुरुंगातून सुटताच कुख्यात गुंड गजानन मारणे गँग विरोधात पहिला FIR, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  कुख्यात गुंड गजानन मारणेची दोन खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने सोमवारी (दि.15) सायंकाळी मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर येतात कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीने बेकायदा जमाव जमवून फटाके वाजवले. तसेच आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. हा प्रकार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. याप्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून खटल्यात मुक्तता मिळाल्यानंतर गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस टाकत त्याची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणुक काढली. यामध्ये 500 हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी झाल्या होत्या. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून मारणे तुरुंगात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून खटल्याप्रकरणी मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड मारणे याची सोमवारी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करुन पोलिसांना आव्हान दिले. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या ताफ्यासह मिरवणुक काढली. उर्से टोलनाका येथे जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवले. तसेच आरडाओरडा करुन त्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रीकरण करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ड्रोन कॅमेरा ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल केला आहे.