खा. सुप्रिया सुळे संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक, विचारला मोदी सरकारला जाब (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. 5 संसद सदस्य आधीच कोरोनाबाधित आहेत. अशा परिस्थितीतही संसदेचं अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीच्या सत्रातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत देशातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर नाराजीही व्यक्त केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे सगळा देश अडीच तीन महिने बंद होता. त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला. कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला. त्यामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु असे होताना दिसत नाही. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी रोजगाराच्या मुद्याला प्राधान्य देत म्हटले की, देश सध्या आर्थिक संकटात आहे. तरुणांना रोजगार नाही. त्यामुळे तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. परंतु तसे होताना दिसत नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी प्रश्नोत्तराचा तास कमी करुन तो फक्त अर्धातासच ठेवण्यात आला. त्यामुळे कमी वेळात प्रश्न मांडून त्याचं उत्तर सरकारकडून मिळवण्याचं आव्हान सर्वच पक्षांच्या खासदारांपुढे आहे.

दरम्यान, संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत अनेक खासदार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना आता क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आलं आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी होणार आहे. कोरोना उद्रेकानंतरचे हे पहिले अधिवेशन आहे. या अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. खासरदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टीत बदल करण्यात आला आहे.