यवतमाळ जिल्ह्यात ‘कोरोना’चा पहिला बळी, उमरखेडच्या महिलेचा मृत्यू

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – उमरखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी (दि.30) सकाळी मृत्यू झाला. ही महिला काही दिवसांपूर्वी मुंबईवरून आल्याची माहिती आहे. तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणात असताना तिचा स्वॅब तपासणीला पाठवण्यात आला होता. शुक्रवारी (दि.29) हि महिला पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा हा पहिलाच मृत्यू आहे. या मृत्यूने प्रशासन व आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 125 वर गेला आहे. यापैकी 99 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्य़ंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र, शनिवार याला अपवाद ठरला. मृत झालेल्या महिलेच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे सुरुवातीपासून अतिशय काळजीपूर्वक लक्ष होते. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मध्य रात्रीपासून शर्तीचे प्रयत्न केले, मात्र, श्वसनाच्या त्रासामुळे तिचा मृत्यू झाला.

नागरिकांनी याबाबत कोणतीही निष्काळजीपणा करू नये. तसेच जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे आणि प्रशासनाच्या सर्व आदेशांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईवरून आलेला आणि सुरुवातीपासून संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या एका जणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 25 झाली आहे.