मराठा आरक्षण : स्थिगितीनंतर सुप्रीम कोर्टात ‘या’ तारखेला पहिली सुनावणी, स्थगिती उठणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या मराठा आरक्षण ( maratha reservation) खटल्यात सुप्रीम कोर्टातील पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. मराठा आरक्षणा ( maratha reservation)ला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी आहे. 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य करतानाच आरक्षणाला स्थिगिती दिली होती. या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. त्यानंतर राज्यात याच मुद्यावरून राजकीय वादळ उठलं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि या प्रकरणातले याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण तातडीने पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे लागाव आणि आरक्षणावरील स्थगिती उठवावी या मागणीसाठी अर्ज केला. त्यामुळे आता या खटल्यात 27 तारखेला नेमकं काय होतंय ? स्थगिती उठवण्याबाबत काही निर्णय होतोय का ? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

यापूर्वीच्या सुनावणीत हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे द्यायची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली होती. परंतु तरीही हे प्रकरण सध्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे लागलेलं आहे. त्यातही ज्या न्यायमुर्ती नागेश्वर राव यांनी मराठा आरक्षणाला स्थगितीचा निर्णय दिला होता त्यांच्याच खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. प्रकरण एकदा मोठ्या खंडपीठाकडे गेलेले असताना देखील ते पुन्हा तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे लागणं हे आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया या प्रकरणाशी संबंधीत वकिलांनी दिली आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगिती उठवण्याबाबत आता 27 ऑक्टोबरला काही निर्णय होतोय का, खंडपीठ यावर काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल.