मोठी बातमी : दीक्षाभूमीत होणार पहिले भारतीय ‘संविधान’ साहित्य संमेलन

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यघटनेतील सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ जूनपासून सुरु होत आहे. हे भारतीय संविधान साहित्य संमेलन ८ व ९ जून रोजी नागपुरात होणार आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे तर निवृत्त न्या. किशोर रोही संमेलनाध्यक्ष आहेत. संविधान फाउंडेशनच्यावतीने हे आयोजन केले आहे.

माजी सनदी अधिकार ई. झेड. खोब्रागडे यांच्या पुढाकारातून संविधान फाऊंडेशनतर्फे आयोजित संमेलनाचे दीक्षाभूमीवरील ऑडिटोरियममध्ये सकाळी १० वाजत उद्घाटन होईल. संमेलन स्वागताध्यक्षा रेखा खोब्रागडे या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात संविधानिक हक्क व कर्तव्याला धरून विविध विषयांवर चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन केले जाणार आहे.

१९५६च्या तुकडीचे सनदी अधिकारी(दिल्ली) पी. एस. कृष्णन यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. अन्न व औषधी प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड हे विशेष अतिथी आहेत. रेखा खोब्रागडे या स्वागताध्यक्ष असून उद्घाटन सत्राचे संचालन आयआरएस क्रांती खोब्रागडे करतील.

आभार प्रा. महेंद्रकुमार मेश्राम मानतील. ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता न्या. किशोर रोही यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल. यात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त सुनीलकुमार गौतम, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. शंकर खोब्रागडे आदी उपस्थित असतील.

Loading...
You might also like