ज्योतिरादित्य, सचिन पायलटनंतर कोण ? भारताच्या माजी क्रिकेटपटूची ‘कमेंट’ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये सत्ता संघर्ष सुरु आहे. राजस्थानमध्ये बंडखोरी करणारे सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवले. तसेच त्यांच्याकडील प्रदेशाध्यपद देखील काढून घेतले. याशिवाय त्यांचे समर्थक तीन आमदारांची मंत्री पदं काढून घेतली. यापूर्वी युवा नेतृत्व असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सचिन पायलट यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आता पुढचा नंबर कोणाचा असा चर्चा सुरु झाली आहे.


मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट यांनी नाराजीचं बंड पुकारलं, त्यानंतर काँग्रेसने भाजपवर आरोप करत सरकार अस्थिर करण्यासाठी पद्यामागून हालचाली करत असल्याचा आरोप केला. काँग्रेस पक्षातील दोन युवा नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर भाजपने देखील काँग्रेस नेतृत्त्वार टीका केली. भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे.

काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील केल्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळले. यानंतर आता सचिन पायलट यांच्या राजीनाम्यानंतर राजस्थानमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यानंतर कोणाचा नंबर असा सवाल करण्यात आला. त्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने राहुलजी..? असं ट्विट केलं आहे. हे ट्विट व्हायल होत आहे. आकाश चोप्रा याने संजय झा यांच्या ट्विटवर कमेंट केली आहे. संजय झा यांनी, पहिल्यांदा ज्योतिरादित्य शिंदे, आता सचिन पायलट. पुढील कोण ? असे ट्विट केले आहे.