बेळगावचे पहिले आमदार सदाशिव भोसले यांचे 101 व्या वर्षी निधन

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, बेळगावचे पहिले आमदार सदाशिव बापूसाहेब भोसले यांचे (वय 101) गुरुवारी (दि. 15) निधन झाले. कचेरी गल्ली, कडोली येथील त्यांच्या निवासस्थानी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना बेळगावचे बापू (गांधी) म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, विवाहित मुलगी, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे.

सदाशिव भोसले यांचा जन्म 1920 मध्ये कडोली गावात झाला होता. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांचा ओढा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे होता. 1942 च्या भारत छोडो आंदोलनातही ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव पडला. गांधीच्या स्पप्नानुसार राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपले जीवन त्यांनी समर्पित केले होते.

श्रीमंत कुटुंबातील असूनही त्यांनी मंदिरात वत्सला यांच्याशी लग्न केले. त्यानंतर 1947 मध्ये पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत ते दक्षिण बेळगावचे आमदार म्हणून निवडून गेले. त्यानतंर 1952 मध्ये बागेवाडी येथून ते दुसऱ्यांदा आमदार झाले. पण हे प्रशासन गांधीजींच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांनी 1955 मध्ये विनोबा भावे यांच्या उपस्थितीत आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारे ते भारतातील पहिले आमदार होते. भोसलेंनी स्वत:च्या स्वातंत्र्यसैनिक पेन्शनमधून 1 रुपयाही खर्च केला नाही. गांधी सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी त्यांनी मुधोळ, बागलाकोट येथे वात्सल्यधाम उभारण्यासाठी या पैशाचा उपयोग केला होता.