Coronavirus : ‘ग्रीन झोन’मध्ये ‘कोरोना’ची एन्ट्री, ‘या’ जिल्ह्यात आढळला पहिला बाधित

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यातील जिल्ह्यांचे तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही अशा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. मात्र, आता ग्रीन झोनमध्येही कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. ग्रीन झोनमधील चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चंद्रपूरमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांनी दिली आहे.

ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा रुग्ण सापडल्याने जिल्ह्याचा ग्रीन झोन दर्जा संपुष्टात येतो की काय अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. शहरातील कृष्णनगर भागात शुक्रवारी 50 वर्षीय व्यक्तीमध्ये लक्षणं आढळून आली होती. त्याला जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.

चंद्रपूर शहरातील कृष्णनगरमधील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने हा भाग आता सील केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली. याबैठकीमध्ये तातडीने करावयाच्या उपाययोजनाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान यापुढे चंद्रपुरमधील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनकाडून सांगण्यात येत आहे.