दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांचे खास फोटो 

रोम : वृत्तसंस्था – लग्नाच्या बातमीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय जोडप्याचे फोटो पाहण्यास बॉलिवूडसह त्यांचे जगभरातील तमाम चाहतेही उत्सुक होते. अखेर हे फोटो समोर आले आहेत. त्यासाठी २४ तासांहून अधिक काळ या जोडप्यांनी चाहत्यांना प्रतीक्षा करायला लावली. बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय जोडपं दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग हे दोघंही विवाहबंधनात अडकले आहे. इटलीट पार पडलेल्या या शाही विवाहाची चर्चा गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर होती.
समोर आलेल्या दीपवीरच्या या खास फोटोसाठी ‘अगदी लक्ष्मी नारायणासारखा दोघांचाही जोडा शोभून दिसतोय’ अशाही प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. या फोटोत दोघंही सुंदर दिसत आहेत. आधी कोंकणी आणि मग सिंधी पद्धतीनं या दोघांचा विवाह १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमो परिसरात असलेल्या एका आलिशान व्हिलामध्ये पार पडला. या लग्नातले फोटो कुठेही व्हायरल होणार नाही याची दक्षता दोघांनीही घेतली होती. त्यामुळे लग्नाला २४ तासांहून अधिक काळ उलटल्यानंतरही दोघांचा एकही फोटो समोर आला नव्हता.
या विवाह सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रणवीर-दीपिकाचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे फक्त 40 जणच या लग्नाला उपस्थित होते. अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी लग्नाला उपस्थित असल्याची माहिती आहे. दीपिकाला आवडणाऱ्या वॉटर लिलीच्या फुलांनी काल लग्नाचा मंडप सजवण्यात आला होता. विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर रणवीर दीपिका मुंबईत परतणार आहे. मुंबईत २८ नोव्हेंबर रोजी त्यांची जंगी रिसेप्शन पार्टी होणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूड उपस्थित राहणार आहे.

रणवीरची ग्रँड एन्ट्री
लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत आणि मेहंदी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दीपिका आणि रणवीरनेच पाहुण्यांचं स्वागत केलं. शुभा मुदगल यांच्या गायनाने दीपिका भावुक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले, असं म्हटलं जातं. तर रणवीरने ‘तुने मारी एन्ट्रिया’ गाण्यावर डान्स करत प्रवेश केला. रणवीरने स्वतः ढोल वाजवत संगीत सोहळ्याची शान वाढवली. रणवीरने गुडघ्यावर बसून दीपिकाचा हात हातात घेतला आणि अंगठी घातली.
पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते दीपवीर
रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला : रामलीला’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही.
‘गोलियों की रासलीला – रामलीला’, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा तीन चित्रपटांमध्ये रणवीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. सुरुवातीला दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधांविषयी बोलणं टाळलं होतं, तरीही चाहत्यांनी दोघांच्या लग्नाची अटकळ बांधली होतीच. मात्र 21 ऑक्टोबरला थेट लग्नाची पत्रिका शेअर करत रणवीर-दीपिकाने चर्चांवर शिक्कामोर्तब केलं.