अकरावीच्या पहिल्या फेरीत 52% विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

मुंबई : 11वी प्रवेश प्रक्रियेत राज्यात पहिल्या फेरीत एकूण 1 लाख 46 हजार 275 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यात शून्य फेरीत निश्चित झालेल्या प्रवेशांची संख्या 29 हजार 686 आहे. तर नियमित फेरीत 1 लाख 16 हजार 589 विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यातून आपले प्रवेश निश्चित केले. राज्यात नियमित फेरी 1 साठी 2 लाख 2 हजार 135 विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले होते. या फेरीत राज्यभरातून अलॉट विद्यार्थ्यांपैकी 52 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.

11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशनिश्चितीची मुदत संपली आहे. आता प्रवेशाच्या नियमित फेरी दोनला सुरुवात झाली आहे. राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागीय मंडळांमध्ये 11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी या 6 विभागीय मंडळांतून 3 लाख 51 हजार 53 विद्यार्थी पात्र ठरले होते. तर 2 लाख 2 हजार 135 विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट केले होते. पहिल्या नियमित फेरीत प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 20 हजार 160 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेशासाठी संमतीपत्र दाखल केले आहे तर 1 लाख 6 हजार 271 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले. कोट्यांतर्गत प्रवेशाची राज्यातील विद्यार्थीसंख्या 10 हजार 318 असून यातील 74 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले.

पहिल्या नियमित फेरीतील राज्यातील 187 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले. 13 हजार 208 विद्यार्थ्यांनी प्रवेश अलॉट होऊनही प्रवेश घेतला नाही. तब्बल 81 हजार 975 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी रिपोर्टिंगच केले नाही, असे शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.