RSS ची पहिली ‘लष्करी’ शाळा एप्रिलपासून सुरु होणार

लखनऊ : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची येत्या एप्रिल पासून पहिली सैनिकी शाळा सुरु करण्यात येणार आहे. या शाळेत भारतीय सैन्यात अधिकारी पदावर रुजू होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संघाची पहिली लष्करी शाळा उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात सुरु होणार आहे. रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर (आरबीएसव्हीएम) असे या शाळेचे नाव आहे. रज्जू भैय्या हे संघाचे माजी सरसंघचालक होते.

शाळेत शिकवले जाणारे विषय
या शेळीची इमारत जवळपास पूर्ण झाली असून इयत्ता सहावीच्या पहिल्या तुकडीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या तुकडीत 160 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या शाळेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी, नौदल अकादमी आणि भारतीय लष्कराच्या तांत्रिक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे संचालक शिव प्रसाद सिंह यांनी दिली आहे.

प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार
या शाळेत प्रवेश घेण्यासाठी 23 फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची 1 मार्चला प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी तपासून पाहण्यासाठी प्रवेश प्रक्रिया घेतल्यानंतर त्यांची मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. यानंतर 6 एप्रिलपासून ही शाळा सरु होईल, असे सिंह यांनी सांगितले.

‘यांच्या’साठी राखीव जागा
आरबीएसव्हीएममध्ये आठ जागा देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या मुलांसाठी राखीव असणार आहेत. या मुलांना वयातही सवलत दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त शाळेत कोणतेही आरक्षण असणार नाही. तसेच शाळेत सीबीएसईचा अभ्यासक्रम असणार आहे. शाळेसाठी शिक्षक आणि व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांची निवड फेब्रुवारी अखेर पर्यंत पूर्ण होणार आहे. तर विद्या भारती या संघाच्या शिक्षण संघटनेमधील व्यक्तीची शाळेच्या मुख्याध्यापकपदी निवड करण्यात येणार आहे.

असा असेल विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गणवेश
या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना गणवेश निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना फिकट निळ्या रंगाची आणि गडद निळ्या रंगाची पँट असा गणवेश असेल. तर शिक्षकांना पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट असा गणवेश असणार आहे. विद्यार्थ्यांना नैतिक आणि अध्यात्मिक मार्गदर्शन देण्यासाठी ही शाळा सुरु करण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगतले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like