टॉसआधीच खेळाडूला कोरोनाची बाधा, SA vs ENG वन डे मॅच पुढे ढकलण्याची नामुष्की

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मॅच सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याने इंग्लंडविरुद्धचा वन डे सामना रविवारपर्यंत (दि. 6 डिसेंबर) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-20 आधीही दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती, पण त्यांना विलगीकरणात ठेवून टी-20 सीरिज खेळवली होती. या सीरिजमध्ये इंग्लंडचा विजय झाला होता.

वन डे सीरिजआधी गुरुवारी खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात दक्षिण आफ्रिकेच्या टीममधील एक खेळाडू पॉझिटव्ह आढळला. दोन्ही टीमच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही वन डे सीरिज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सहमतीने हा निर्णय झाल्याचेही दक्षिण आफ्रिका बोर्डाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वीही दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना कोराेनाची बाधा

टी-20 सीरिजआधीही दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खेळाडूंच्या संपर्कात आलेल्या आणखी दोन खेळाडूंना क्वाॅरंटाईन केले होते. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातल्या गोपनियतेमुळे खेळाडूंच्या नावाची घोषणा आम्ही करणार नसल्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितले होते. यापूर्वी आतापर्यंत पाकिस्तानचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पाकिस्तानी खेळाडू कोरोना पसरवू शकतात, अशी भीती न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाला आहे. पाकिस्तानची टीम मागच्या 10 दिवसांपासून क्वाॅरंटाईन आहे. एकाच वेळी त्यांचे 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर आणखी एका खेळाडूला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.