अरे देवा ! 1 ली तील मुलगा करतोय अश्लील कृत्य ? शाळेनं प्रवेश नाकारला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूरमध्ये राईट टू एज्युकेशन च्या माध्यमातून शालेय विध्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देणे संविधानानुसार बंधनकारक आहे. मात्र पंढरपूर येथील एक अजब प्रकरण उघडकीस आले आहे. ज्यामध्ये एका शाळेने पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाचा प्रवेश एक धक्कादायक कारण देत रद्द केला आहे. केवळ ६ वर्षांचा असणारा हा मुलगा सातत्याने अश्लील चाळे करत असल्याने ही कारवाई करत असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले. तसे लेखी पत्रही त्यांनी पालकांना दिले आहे.

काय आहे प्रकरण :

पंढरपूर येथील फिनिक्स इंग्लिश मीडियम शाळेतला हा प्रकार आहे. ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून पहिलीपासून प्राथमिक शिक्षण येथे दिले जाते. संबंधित मुलाला या शैक्षणिक वर्षासाठी जूनमध्ये शाळेत प्रवेश मिळाला होता. त्यानंतर तो नियमित शाळेत जात होता. २-३ दिवसांपूर्वी शिक्षकांनी मुलाच्या पालकांना शाळेत बोलावून सदर प्रकार सांगून शाळेतून काढून टाकत असल्याचे पत्रच पालकांच्या हातात दिले. यानंतर पालकांना मोठा धक्का बसला. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार हा मुलगा शाळेतील विद्यार्थीनी आणि शिक्षिकेशी सुद्धा असभ्य वर्तन आणि त्यांच्याकडे पाहून अश्लील चाळे करतो. कित्येकदा सांगूनही त्याच्यात सुधारणा नसल्याने आम्ही त्याला शाळेतून काढून टाकण्याची कारवाई करत आहोत असे ही त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत संबंधित शाळेचे को ऑर्डिनेटर नागेश माळवे यांना याबाबत विचारले असता हा प्रकार खरा असून या मुलाच्या अशा कृत्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो आणि शाळेची गुणवत्ता खराब होऊ शकते. याचा विचार करूनच त्याचा प्रवेश रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अशा मुलांना तज्ज्ञांचे समुपदेशन गरजेचे :

या सर्व प्रकारामुळे मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय आणि शाळेने केलेल्या आरोपांमुळे आता या विद्यार्थ्यास दुसरीकडे शिक्षण घ्यावे लागणार आहे. मात्र याबाबतीत शाळेने चुकीचा निर्णय घेतल्याची भूमिका काही तज्ज्ञांनी घेतली आहे. मुले अशा प्रकारे चुकीचे वागत असतील तर अशा मुलांना शाळेतून काढून टाकणे हा उपाय नसून तज्ज्ञांच्या समुपदेशनाने अशा मुलांमध्ये बदल घडवून आणता येतो असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.