नारायण राणेंच्या ‘त्या’ मागणीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावरून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. चिपी विमानतळाचं काम आता पूर्ण होण्याचा मार्गावर आहे. या विमानतळाच्या नामकरणासाठी दोन दिग्गज नावांचा प्रस्ताव समोर आला आहे. यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावांचा समावेश आहे.

दरम्यान, भाजपाचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. यावेळी नितेश राणे ट्विट करत आपली भूमिका मांडली. नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ नारायण राणेंचा Dream Project आहे. म्हणून या विमानतळाला “स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ” हे नाव दिलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तसेच नारायण राणे यांनी देखील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, असं मत व्यक्त केलं आहे. यावर प्रथम विमानतळ सुरू करा, मग नाव द्या, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले, की केंद्राने राज्याला नाव देण्याचा अधिकार असल्याचं सांगितलंय. विमानतळ लवकर चालू करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत.२६ जानेवारी २०२१ ला हे विमानतळ सुरू करण्याबाबत संबंधितांना सांगितलं आहे. याबाबत परवाना (लायसन्स) मिळालं की लवकरच विमानतळ सुरू करू. हे विमानतळ अत्याधुनिक पद्धतीने बनवलं असल्यानं त्याचा मोठा उपयोग होणार आहे.