पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या मराठीच्या राष्ट्रीय बातम्या बुधवारपासून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सुरु करण्यात आल्या आहेत. आकाशवाणीच्या इतिहासात राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वाती महाळंक आणि अविनाश गोडबोले यांनी हे बातमीपत्राचे वाचन केले.
सुरुवातीच्या काळात सर्व प्रादेशिक राष्ट्रीय बातमीपत्रे दिल्लीतून प्रसारित केली जात होती. 2017 मध्ये संबंधित राज्यांच्या राजधानी असलेल्या केंद्रामध्ये बातमीपत्रे हस्तांतरित करण्यात आली. मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रातून सकाळी 8.30, दुपारी 1.30 आणि रात्री 8.30 वाजता दिले जात होते. गेले तीन महिने कोरोनाच्या संकटामुळे राष्ट्रीय बातमीपत्र बंद होते. मुंबईतील परिस्थिती अजूनही पूर्ववत झाली नसल्याने बुधवारपासून पुणे केंद्रातून बातमीपत्रास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आकाशवाणी वृत्त विभागाचे उपसंचालक नितीन केळकर यांनी दिली.
दिल्लीतील बातमीपत्राची वेळ वाढल्याने आता पुण्यातून सकाळी 9.20, दुपारी 1.30 आणि रात्री 9.20 असे तीन वेळा राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होणार आहे. तसेच सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी कोरोना महाराष्ट्र हे स्पेशल बुलेटिन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना स्थितीचा ताजा आढावा, समाजोपयोगी उपक्रम, उपाययोजना, ह्यमूमन इंटरेस्ट बातम्या यावर भर दिला जात आहे. पुणे केंद्रातील हे बातमीपत्र राज्यातील सर्व केंद्रे प्रसारित करतात. हे बातमीपत्र मागील तीन महिन्यापासून प्रसारित करण्यात येत आहे. यापूर्वी दिवसातून तीनवेळा सकाळी 7.10, दुपारी 3 आणि रात्री 7 वाजता या तीन राज्य बातमीपत्रापैकी सकाळी 7.10 चे बातमीपत्र पुण्यातून प्रसारित होत होते.