लवकरच Solapur-Pune मेमू धावणार ! पुणे आणि सोलापूरकरांचा प्रवास सुखकर व जलद होणार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे व सोलापूरकरांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा तसेच वेळेची बचत व्हावी याकरिता सोलापूर-पुणे मेमू ही गाडी लवकरच धावणार असून त्यादृष्टीने पाठपुरावा सुरु आहे. रेल्वे प्रशासानाकडून सोलापूर विभागातील विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाचे काम प्रगतिपथावर सुरु आहे. येत्या काही महिन्यांतच विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच ही मेमू सुरु करण्यास रेल्वेकडून हिरवा कंदील मिळणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

मेमू या रेल्वे गाडीस जूननंतर ग्रीन सिग्नल मिळण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोना महामारीमुळे विभागातील सर्व पॅसेंजर गाड्या बंद असल्याने जूनपर्यंत सोलापूरकरांना मेमूची प्रतीक्षा करावी लागेल. सोलापूर विभागात विद्युतीकरणाचे काम पूर्ण नसल्याने व कोरोना महामारीमुळे विभागातील डेमू गाड्या बंद आहेत. डेमू गाड्या या डिझेलवर धावत असल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून मेमू सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता या मागणीची पूर्तता लवकरच होणार आहे. याबाबत वरिष्ठ विभागीय मुख्य परिचालन व्यवस्थापक प्रवींद्र वंजारी म्हणाले की, सोलापूर विभागात विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. येत्या 3 ते 4 महिन्यांत काम पूर्ण होईल. विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच मध्य रेल्वेकडून मेमूचे रेक घेतले जातील व त्यानंतर प्रथम सोलापूर-पुणे मेमू धावण्यास सुरवात केली जाईल.