शरद पवारांना पहिल्यांदाच मी इतक संतापलेलं पाहिले आणि ते बैठकीतून निघाले, खा. राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या वर्षी तब्बल 37 दिवस राज्यात सत्तानाट्य सुरू होते. याकाळात राज्यातील जनतेने राजकारणातील डाव-प्रतिडाव कसे असतात हे पाहिले. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने सोडलेली भाजपची साथ, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळवलेला हात, फडणवीस आणि पवारांचा पहाटेचा शपथविधी, अजित पवारांनी दिलेला राजीनामा, फडणवीस यांचे कोसळलेल सरकार आणि उद्धव ठाकरेंचा शिवतीर्थावरील शपथविधी अशा उत्कंठावर्धक घटना या सत्ता नाट्यात घडल्या. या संपूर्ण घटनाक्रमाला आता एक वर्ष पूर्ण झाले असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून काही गौप्यस्फोट केले आहेत.

खा. संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत भाजप आणि त्यांच्या नेतृत्वावर तोफ डागणारे खा. राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सातत्याने संपर्कात होते. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेल्या एका बैठकीत नेमके काय घडले याची माहिती राऊत यांनी त्यांच्या लेखात दिली आहे.

शरद पवार व माझ्यात 35 दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. 17 नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारला की ‘तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे, तेव्हा मी त्यांना आमचा 170 असल्याचे सांगितले होते. त्या आकड्यावरून खिल्ली उडवली गेली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आलाच नव्हता. पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली होती.

खरगे, पवार चकमकीने बैठीकाचा नूर पालटला
तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला असे राऊत यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे.

…तो दावा खा. राऊतांनी खोडून काढला
राष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास उत्सुक होती. त्यासंदर्भात त्यांची दिल्लीत अमित शहांसोबत बैठकही झाली होती, असा दावा नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘ट्रेडिंग पॉवर’ पुस्तकात केला आहे. मात्र राऊत यांनी हा दावा खोडून काढला आहे. अजित पवारांचा फोन नेहरू सेंटरमधील बैठकीनंतर ‘स्विच ऑफ’ झाला व दुसऱया दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले. फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे ‘ मी त्याक्षणीही सांगितले, ‘चार वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील, हे यासाठीच सांगायचे की, पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली अशा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे ‘नाट्य’ तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.