अमेरिकेने जे 100 वर्षांपूर्वी केले ते भारताकडून आता करण्यात येतय, जाणून घ्या टॉय फेअर म्हणजे काय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी खेळण्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मोठी घोषणा केली आहे. मोदी यांनी देशामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या खेळण्याच्या जत्रेचं उद्घाटन केले आहे. तसेच देशाला खेळण्यांच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनवा असे आवाहन करण्यात आले आहे. मोदी पुढे म्हणाले, भारतीय खेळणी हा इथल्या जीवनशैलीचा भाग असलेल्या रियूज, रिसायकल संस्कृतीचा वापर करतात. तसेच त्यांनी उत्पादकांना कमी प्लास्टिक आणि पुर्नवापर होइल असे साहित्य वापरण्यास सांगितले आहे.

देशी खेळण्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून खेळण्यांची जत्रा भरवण्याची कल्पना समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शनिवारी खेळण्यांच्या जत्रेचं व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी मोदींनी देशातील टॉय क्लस्टरशी संवाद देखील साधला. कर्नाटकात गेल्या २०० वर्षांपासून खेळण्याचे क्लस्टर बनवले जात आहेत. तसेच खेळणी तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणा असे मोदींकडून आवाहन करण्यात आले आहे.

मोदी पुढे म्हणाले, १०० अब्ज डॉलरच्या खेळणी उद्योगात भारताचा वाटा अल्प प्रमाणात असल्याने आपल्या ८५ टक्के खेळणी हि बाहेरून आयात करावी लागतात. हे बदलण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. भारतात हातांनी बनविलेल्या खेळण्यांना देशवासीयांकडून प्रोत्साहन देण्यात आले पाहिजे.अस्सल भारतीय, पर्यावरण पूरक व आकर्षक आणि अभिनव खेळणी उत्पादनाकडे भारतीय उद्योजकांनी लक्ष घातले पाहिजे. तसेच हाताने बनविलेल्या खेळण्यांना अधिकाधिक बाजारपेठ मिळाली पाहिजे.

मोदी पुढे म्हणाले, भारताच्या खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून याचा समावेश २४ प्रमुख उद्योगांत करण्यात आला आहे. तसेच १५ मंत्रालयाचा सहभाग असलेली राष्ट्रीय खेळणी कार्य योजना बनवण्यात आली आहे. लहान मुले आजूबाजूला जे पाहतात त्याचे अनुकरण ते करत असतात. सध्याच्या कोरोना काळात मुलांना वाटत असेल की खेळण्यातील बाहुला-बाहुलीलाही मास्क पाहिजे असे वाटते. बुद्धिबळ नावाने जो खेळ जगात प्रसिद्ध आहे तो भारतात प्राचीन काळी चतुंग किंवा चादुरंगा नावाने खेळण्यात येत होता. आधुनिक लूडो हा प्राचीन काळी पच्चीसी या नावाने प्रसिद्ध होता. तसेच राम बाल्यावस्थेत असताना कितीतरी विविध खेळण्यांबरोबर खेळायचा त्याचे वर्णन रामायणात करण्यात आले आहे. जोपर्यंत आम्ही नवनवीन पद्धती, नवनवीन प्रयोग करत नाही तोपर्यंत आम्ही जगाच्या गरजा पुरविण्यासाठी पूर्णपणे सक्षम होऊ शकत नाही.

अमेरिकेत १०० वर्षांपूर्वी टॉय फेअर
भारतातील पहिल्या टॉय फेअरची सुरुवात २७ फेब्रुवारी २०२१ मध्ये झाली. पण अमेरिकेत याच टॉय फेअरची सुरुवात १०० वर्षांपूर्वी करण्यात आली होती. अमेरिकेत पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टॉय फेअर १९०३ मध्ये भरवण्यात आला होता. याला मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्याने अनेक देशांमध्ये टॉय फेअरची सुरुवात करण्यात आली. यावेळी अमेरिकेच्या इंटरनॅशनल टॉय फेअरमध्ये डिजनीने डिजनी ज्यूनिअरवर १३० पेक्षा जास्त खेळण्यांचं अनावरण करण्यात आले होते.

हॅमेलज टाटयल स्पॉन्सर
रिलायन्स रिटेलची मालकी असलेली सर्वात जुनी ब्रिटिश बहुराष्ट्रीय खेळण्याची कंपनी हॅमलेज ही देशातील पहिल्या ऑनलाइन टॉय फेअरचे टायटल स्पॉन्सर आहे. जत्रेमध्ये कंपनीकडून त्यांचा व्हर्च्युअल बूथ स्थापन करण्यात येणार आहे. टॉय फेअरमध्ये १ हजारांहून अधिक स्टॉलसह एक व्हर्च्युअल प्रदर्शनसुद्धा भरवण्यात येणार आहे. तसेच पॅनेल चर्चा आणि वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शनसुद्धा करण्यात येणार आहे.