तिसऱ्या लग्नासाठी मांडवात येताच पहिल्या बायकोने धो-धो धुतले

कराची : वृत्तसंस्था – जो गुन्हा करतो तो कधीच पोलिसांची मदत मागत नाही. मात्र, पाकीस्तानातील कराचीमध्ये असा एक प्रकार घडला आहे. यामध्ये गुन्हा करणाऱ्यानेच पोलिसांची मदत मागितली आहे. एका व्यक्तीने दोन लग्न केली. याची माहिती पहिल्या पत्नीला सांगितली नाही. मात्र, तिसऱ्या लग्नाचा घाट घातला आणि त्याचा डाव फसला. तिसऱ्या लग्नासाठी मांडवात येताच पहिल्या पत्नीने गुडघ्याला बाशिंग बांधून आलेल्या आपल्या नवरदेव पतीला मांडवात नातेवाईकांसमोर जबरदस्त मारहाण केली.

पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मदिहा आणि नातेवाईक कराचीमध्ये असिफ रफीकच्या लग्नात दाखल झाले. मदीहा आणि आसिफचा 2014 मध्ये विवाह झाला. रफिकने जिन्ना विद्यापीठातील एका मुलीसोबत लग्न केले. मात्र, या लग्नाची माहिती त्याने आपल्या पहिल्या पत्नीला दिली नाही. ज्यावेळी हे प्रकरण समोर आले त्यावेळी त्याने पहिल्या पत्नीची माफी मागून आयुष्यात कधीही अंतर देणार नसल्याचे वचन दिले. त्यानंतर देखील रफिकने तिसऱ्या लग्नाचा घाट घातला. पहिली पत्नी मदिहाने आपल्या नातेवाईकांसोबत लग्न मंडपात जाऊन रफिकला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.

पहिल्या पत्नीकडून आणि नातेवाईकांकडून मारहाणीनंतर त्याने आपला जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी देखील त्याला मारहाण केली. पोलिसांच्या तावडीतून सुटून त्याने एका बसच्या खाली लपण्याचा प्रयत्न केला. रफिकच्या म्हणण्यानुसार, त्याने पहिली पत्नी मदिहाला घटस्फोट दिला होता. त्यामुळे पहिल्या पत्नीसोबत सल्लामसलत करण्याचा काहीच संबंध नव्हता. त्याशिवाय एकाच वेळी चार लग्न करण्याचा अधिकार असल्याचा दावा रफिकने केला आहे.