अर्धवट माहितीने बाळाच्या तोंडातून फिरवला जिवंत मासा…

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – मुलगी तोंडातून लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडातून फिरवला तर, लाळ गाळायचे बंद होते. या अर्धवट माहितीने ऊसतोड करणाऱ्या महिलेनं ४ महिन्याच्या मुलीच्या तोंडात चक्क जिवंत मासा फिरवला. पण, गुळगुळीतपणामुळे मासा निसटून थेट लहान बाळाच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला आणि त्या चिमुकलीचा जीवाशी संघर्ष सुरु झाला. अखेरीस डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे आणि शास्त्रक्रियेनंतर या बाळाचा जीव वाचला.

जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव इथले बापू माळी यांचं कुटुंब भिमा पाटस कारखान्यावर ऊस तोडणीचं काम करतात. सध्या हे कुटुंब बारामती तालुक्यातल्या शिर्सुफळ इथे ऊस तोड करण्यासाठी आले आहेत. बापू माळी यांची साडेचार महिन्याची अनु ही मुलगी तोंडातून सतत लाळ गाळते. हे लाळ गाळणं थांबवायचं असेल, तर जीवंत मासा तोंडातून फिरवावा लागेल, अशी अर्धवट माहिती तिच्या मावशीला मिळाली. त्यावरुन तिनं जवळच एका पाटातून बोटाच्या आकाराचा मासा आणून त्या लहानगीच्या तोंडातून फिरवण्याचा प्रयत्न केला. मात्र मासा गुळगुळीत असल्यानं निसटून थेट अनुच्या अन्ननलिकेत अडकला. त्यामुळं अनुला श्वासही घेता येईना. यावेळी बापू माळी यांनी तातडीने अनुला बारमती येथील डॉ. राजेंद्र मुथा यांच्या दवाखान्यात दाखल केलं. दरम्यानच्या काळात अनुचा श्वास थांबला होता. त्यामुळं डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा यांनी तिच्या छातीवर संजीवनी क्रिया करत तिचं हृदय पुन्हा चालू केलं. त्यानंतर दहा मिनिटांच्या शस्त्रक्रियेनंतर अन्ननलिकेतला मासा बाहेर काढण्यात आला.

बारामतीमधील बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. वैभव मदने आणि भूलतज्ञ अमरसिंह पवार यांच्या पथकानं ही शस्त्रक्रिया करत अनुला जीवदान मिळवून दिलं आहे. ही शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टरांसाठी एक मोठं आव्हान होतं. मात्र अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन यशस्वी करत चिमुकलीला जीवदान दिल्याचं समाधान डॉ. वैभव मदने यांनी सांगितलं शस्त्रक्रियेनंतर अनुच्या आई-वडिलांना देवदूत बनून आलेल्या डॉक्टरांचे आभार कसे मानावेत हेच समजत नव्हतं. त्यांच्या इतकाच आनंद रुग्णालयात हजर असलेल्या अन्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाही झाला होता. मात्र अर्धवट ज्ञान असताना केलेला उपचार एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो याचाच प्रत्यय या घटनेच्या निमित्तान आला आहे.

आज ही महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक मुलांचा जीव जात आहे. कुणी भोंदू बाबाचे ऐकून तर कुणी देवाच्या नावाखाली लहान मुलांचे बळी घेतले जात आहे. याचा विचार खरतर प्रत्येक पलकाने केला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट करु नये याचा विचार करणे गरजेचे आहे.