मेळघाट संघर्ष चिघळला, आदिवासी नागरिकांवर गोळीबार

चिखलदरा (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाईन – मंगळवारी मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पवाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावातील अदिवासी आणि वनखात्यामध्ये संघर्ष झाला होता. त्यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात २० सुरक्षा रक्षक जवान आणि नागरिक जखमी झाले होते. हा प्रकार ताजा असतानाच बुधवारी (दि.२३) वन संरक्षकांनी केलेल्या गोळीबार व मारहाणीत २५ ते ३० आदिवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अमोना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तेलपानीसह आठ पुनर्वसित गावांमधील आदिवासींनी जंगलातील त्यांच्या मूळगावी आठवडाभरापूर्वी बस्तान मांडले. त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. वनाधिकारी व आदिवासी यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने मंगळवारी सशस्त्र संघर्ष झाला.
चिखलदरा तालुक्यातील तेलपाणी या आदिवासी गावातील नागरिकांचे अकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा नाहीत.

मोबदल्यातील शेती आणि पूर्ण आर्थिक साहाय्य अदिवासींना मिळालेले नाही. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. बुधवारी विभागीय वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने तेलपानी येथील आदिवासींना जंगलाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासी जंगलाबाहेर जाण्यास तयार झाले नाहीत. त्यामुळे गोळीबार करण्यात आला. यामध्ये आदिवासी जखमी झाले आहेत तर आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलास आग लावण्यात आली असून साहित्याची नासधूस करण्यात आली आहे. आदिवासी युवकांच्या १० दुचाकी पेटविल्या, तर २० दुचाकी जप्त केल्या. तसेच लाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.