हॉकर्स आणि पोलिसांमध्ये तुफान हाणामारी, २ पोलीस जखमी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – रेल्वेस्टेशनसमोर लावण्यात येणाऱ्या हातगाड्यांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या हातगाड्या काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी हातगाडीवाले आणि आरपीएफ पोलीसांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत ५ हातगाडीवाले आणि २ आरपीएफ पोलीस जखमी झाले. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला.

मागील काही दिवसांपासून हातगाडी आणि आरपीएफ पोलिसांमध्ये हातगाड्या काढण्यावरुन वाद सुरु होते. या वादातून ते एकमेकांना मारहाण करत होते. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. काल सायंकाळी रेल्वेस्टेशन समोरील वडपाव, दाल चावल, अंडा आम्लेट या हातगाड्या काढण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये पुन्हा तक्रार झाली. याचे रुपांतर भांडणात झाले. तेव्हा हातगाडीचालकांनी आरपीएफ चे कॉन्स्टेबल करचे आणि गुरव या दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना समजता आरपीएफचे आणखी पोलीस या ठिकाणी आले. त्यांनी हातगाडी चालकांना झोडपून काढण्यास सुरुवात केली.

मारहाण झालेल्यांपैकी एका पोलिसाला रेल्वे हॉस्पिटलमध्ये, तर दुसर्‍या पोलिसाला अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर आरपीएफ पोलिसांनी केलेल्या मारहाणीत शुभम राजेश गायकवाड (वय 24, रा. रामवाडी), आकाश सुरेश रणदिवे (वय 20, न्यू धोंडिबा वस्ती), शिवा राजेश गायकवाड (वय 26, रा. रामवाडी), फिरोज नुर सय्यद (वय 19, रा. रामवाडी) आणि चंद्रकांत राजू जाधव (वय 30, रा. रामवाडी) हे 5 जण जखमी झाले आहेत.

या जखमींना सदर बझार पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल मुजावर यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.