Solapur News : रतनचंद शहा बँकेच्या टेंभुर्णी शाखेत 5.57 कोटींचा अपहार, दोघांविरोधात FIR

टेंभूर्णी/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे राज्यातील सहकारी बँकामधील व्यवहारामध्ये अनियमितता आढळून आल्याने दोन बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे रतनचंद शहा बँकेच्या टेंभुर्णी शाखेत तब्बल 5.57 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बँकेचा तत्कालीन शाखाधिकारी आणि कॅशिअर यांच्या विरोधात बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर (वय-67 रा. मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहर व परिसरातील बँकेचे खातेदार व ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली असून पैसे काढण्यासाठी खातेदारांकडून गर्दी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा येथील रतनचंद सहा बँकेच्या टेंभुर्णी शाखेत 2016 ते 2020 या कालावधीत बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या टेंभुर्णी शाखेच्या खात्यावरील तसेच हातावरील शिल्लक असा एकूण 5 कोटी 27 लाख 2 हजार 822 रुपयांचा अपहार केला आहे. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन सेवानिवृत्त शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरु (रा. सांगोला महाविद्यालय शेजारी, कडलास रोड, सांगोला), व तत्कालीन कॅशियर अशोक भास्कर माळी (रा. शुक्रवार पेठ, टेंभुर्णी ता. माढा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे तपास करत आहेत. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. यातील आरोपींचा शोध सुरु असून त्यांना लवकरच अटक केली जाईल असे पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी सांगितले.

टेंभुर्णी शाखेत शहर व परिससरातील, व्यापारी व नागरिकांच्या लाखो रुपयांच्या ठेवी आहेत. रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी येथील शाखेत अपहार झाल्याचे समजताच शहर व परिसरातील खातेदार व ठेवीदारांची मागील दोन दिवसांपासून पैसे काढण्यासाठी मोठ गर्दी होत आहे. बँकेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. तर बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी स्वत: टेंभुर्णी येथील शाखेत उपस्थित राहून बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून, खातेदार व ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. बँकेतील त्यांच्या ठेवी सुरक्षित असल्याचे सांगितले.