यवतमाळ : कोंबड बाजारावर छापा, 5 जणांना अटक

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – वणी (Vani) तालुक्यातील कोंबड बाजारावर (Kombad Market) पोलिसांकडून छापा (Raid) टाकण्यात आला. या छाप्यामध्ये ५ जणांना ताब्यात घेण्यात आले, तसेच साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरपूर पोलिसांकडून (Shirpur Police) ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जुगारींमध्ये खळबळ उडाली आहे. जीवन काकडे, संदीप बांदुरकर, सुभाष लोंढे, भास्कर वाचोसे आणि मारोती खंडाळकर असे अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत.

पिंपरी येथील जंगलात कोंबड बाजार सुरू असल्याची टीप शिरपूर पोलिसांना समजली होती. त्यानुसार शिरपूर पोलिसांनी सापळा रचुन त्या ठिकाणी छापा टाकला. पोलीस आल्याची चाहूल लागताच १० ते १५ जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तसंच ५ जणांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. ९ दुचाकी, मोबाईल व रोकड, असा एकूण पाच लाख ४४ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. ठाणेदार सचिन लुले ( Sachin Lule) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शेतकऱ्यांचा वेश केला धारण
मागील काही महिन्यांपासून पिंपरी येथील जंगलात हा कोंबड बाजार सुरू होता. मात्र, त्यावर अजूनपर्यंत कारवाई करण्यात आली नव्हती. जुगारींना आपला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी शेतकऱ्यांचा वेश परिधान केला आणि लपत-छपत जाऊन जुगारींना ताब्यात घेण्यात आले. तरीही जुगारींना याची चाहूल लागल्यामुळे १० ते १५ जण पळून जाण्यात यशस्वी झाले.