गुड न्यूज ! ‘कोरोना’च्या लसीसाठी ‘या’ 5 कंपन्या सज्ज

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून जगभरातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाला अटकाव करण्यासाठी देशातील 100 हून अधिक देशांतील कंपन्या लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील काही कोरोना प्रतिबंधक लस महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. काही कंपन्यांनी आपली लस प्रभावी ठरत असल्याचा दावा केला असून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीकडे त्यांनी वाटचाल केली आहे. अमेरिकेने पाच कंपन्यांच्या लसींवर विश्वास दाखवला असून त्याबाबतची महत्त्वाची घोषणा लवकर होण्याची शक्यता आहे. एक इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन प्रशासनाने लसीसाठी पाच कंपन्यांची निवड केली आहे. यामध्ये मॉडर्ना इंक, एस्ट्राजेनेका पीएलसी, फाईजर इंक, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन आणि मर्क एंड को इंक या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना लस विकसित करण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

या लसीच्या महितीबाबत येत्या काही दिवसांमध्ये व्हाईट हाउसकडून मोठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतील अनेक आरोग्य तज्ज्ञांनी सध्या लसींवर काम सुरु केले आहे. या वर्षाखेरीस कोरोनावर लस सापडण्याचा दावा यापूर्वीच करण्यात आला होता. येत्या एक-दोन महिन्यात या लस चाचणीचा आणखी टप्पा पूर्ण होणार आहे. मॉडर्ना आणि एस्ट्रजेनेका ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसींची चाचणी महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचे वृत्त आहे. या लसींसाठी मोठ्या प्रमाणात क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार आहे. या लसींची क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी जवळपास एक लाख स्वयंसेवकांची आवश्यकता भासणार आहे.

अमेरिकन प्रशासनाने निवड केलेल्या कंपन्यांची उत्पादन क्षमता अधिक चांगली असून डोस निर्मिती करण्यासाठीचे आव्हान पेलण्यास या कंपन्या सक्षम आहेत. दरम्यान, यापूर्वी मॉडर्ना इंकने केलेल्या दाव्यानुसार, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये आढळणाऱ्या अ‍ॅण्टीबॉडीज एवढी पातळी ही लस दिलेल्या व्यक्तीमध्ये आढळली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. टाल जॅक्स यांनी सांगितले की, या लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात mRNA-1273 ही लस कोरोनावर प्रभावी ठरू शकते, असे आढळले असल्याचे काही दिवसापूर्वी जाहीर केले होते. तर, चीनमध्ये ही एका कंपनीने आपली लस 99 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. ही लस पहिल्या टप्प्यात यशस्वी झाली असून दुसऱ्या टप्प्यातील चाचणी युरोपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे डॉ. टाल जॅक्स यांनी सांगितले.