भाजपा नगरसेवकांना 5 कोटीचा निधी तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकाची केवळ 2.5 कोटीवर ‘बोळवण’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडून सोमवारी (दि..1) मांडण्यात आले. अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना सढळ हाताने प्रत्येकी 5 कोटीचा निधी दिला आहे. तर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांची मात्र प्रत्येकी अडीच कोटींवर बोळवण केली आहे. महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. रखडलेली विकासकामे मार्गी लावणे आणि अधिकाधिक नागरी सुविधा देण्यासाठी भाजपाने नगरसेवकांना भरघोस निधी दिला आहे. स्थायी समितीच्या सदस्यांना मात्र 98 नगरसेवकांमध्ये अधिक निधी देण्यात आला आहे. प्रत्येक सदस्याला दहा ते बारा कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अंदाजपत्रक तयार केल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

लॉकडाऊनमुळे नगरसेवकांना प्रभागातील विकासकामे करता आली नाहीत. कामे होत नसल्याची नागरिकांची ओरड होत असल्याने निवडणुका तोंडावर असल्यामुळे नगरसेवक अस्वस्थ झाले होते. त्यामुळे स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत सुमारे पावणे तीनशे कोटी रुपयांची वर्गीकरणे मान्य केली. निविदा, पुर्वगणनपत्रक, अशा प्रकारे कामे करुन सन 2021-22 च्या अंदाजपत्रकातून ही कामे केली जाणार आहेत. अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर कामांचे पुर्वगणकपत्रक करणे, निविदा तयार करणे, कार्यादेश यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. याच काळात निवडणूकांची प्रभाग रचना, वॉर्ड पद्धती यांचा निर्णय होणार आहे. त्यामुळे मिळालेला निधी कसा खर्च करावयचा हा मोठा प्रश्न नगरसेवकांपुढे निर्माण होणार आहे.