सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणातील आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील टोळी युद्धातून सराईत गुन्हेगार निलेश वाडकर याचा रविवारी (दि.१३) सायंकाळी खून करण्यात आला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात योगेश जांभळे (वय-२६ रा. पर्वती, पुणे) आणि अभिजीत गणेश कडु (वय-२६) या दोघांना हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. आज दोघांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

योगेश जांभळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पुणे शहरातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार असताना देखील त्याने पुण्यात येऊन सराईत गुन्हेगार निलेश वाडकरचा निर्घृण खून केला. आरोपीने तडीपार असताना देखील वाडकरचा खून कसा केला, या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार सुनील उर्फ चॉकलेट किशोर डोईफोडे व त्याचे अन्य साथिदार नवनाथ वाल्हेकर, अविनाश देवकुळे, नितीन मेटकरी, समीर नाटेकर व पप्पू गायकवाड हे सर्व सराईत गुन्हेगार आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून या सर्व आरोपींबाबत चौकशी करुन त्यांना अटक करावयाची आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल आणि कोयता हे देखील जप्त करायचे आहेत. गुन्ह्यात फरार असणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन अटक करुन या गुन्ह्यामध्ये कोणाचा हात आहे, कोणाच्या सांगण्यावरुन हा गुन्हा केला याचा तपास करावयचा असल्याने पोलिसांनी ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पूर्ववैमन्यस्य आणि हप्ता वसुलीला विरोध केल्याच्या वादातून सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. दत्तवाडी पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये तडीपार गुंडासह दोघांना अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर. भलगट यांनी आरोपींना १९ जानेवारीपर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यामध्ये मयत निलेश वाडकर याचे साथिदार गणेश जाधव, सुजीत भंडवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी निलेश कदम याने फिर्याद दिली आहे.
सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. एस.ए. क्षीरसागर यांनी सरकारची बाजू मांडली. या प्रकरणाचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवरे हे करीत आहेत.