LIC कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 10 मे पासून पाच दिवसांचा आठवडा, शनिवारी मिळणार सुट्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एलआयसीच्या सर्व कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. त्यामुळे एलआयसी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवस काम करावे लागणार आहे. हा नियम 10 मे पासून लागू करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना प्रत्येक शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 मे पासून एलआयसीची सर्व कार्यालये सोमवार ते शुक्रवार या पाच दिवशी खुली राहणार असून सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत कामकाज सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास दीड लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने यापूर्वी एलआयसी कर्मचाऱ्यांना 25 टक्के वेतनवाढ मंजूर केली होती. तसेच कर्मचारी संघटनाकडून पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने ही मागणी मंजूर करत कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करण्यास मंजूरी दिली होती. त्यानुसार 10 मे पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 1 लाख 40 हजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

2017 पासून एलआयसीमध्ये वेतन वाढ रखडलेली होती. नवीन वेतनवाढ 1 ऑगस्ट 2017 पासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनामधील फरक मिळणार आहे. कर्मचाऱ्यांनी 40 टक्के वेतन वाढ करावी अशी मागणी केली होती. तसेच केंद्र सरकारने नोगोशिएबल इन्स्ट्रुमेट अ‍ॅक्ट 1881 च्या कलम 25 मध्ये सुधारणा करुन 5 दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू केला आहे.

अर्थजगतासाठी आव्हानात्मक ठरलेल्या या काळात एलआयसीने भरीव कामगिरी केली आहे. मागील आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये एलआयसीने नवीन हप्त्यांपोटी 1.84 लाख कोटी रुपये असे आजवरचे सर्वोच्च उत्पन्न कमावलं आहे. व्यक्तिगत विम्याच्या बाबतीत पहिल्या वर्षाच्या हप्त्यापोटी एलआयसीचे उत्पन्न हे 56 हजार 406 कोटी रुपये आहे. जे आधीच्या वर्षाच्या तुलनेत 10.11 टक्क्यांनी वाढले आहे. एलआयसीने मागील वर्षी 2.10 कोटी पॉलिसींची विक्री केली होती. त्यापैकी 46.72 लाख पॉलिसी या केवळ मार्च 2021 मध्ये विकल्या गेल्या होत्या.