कामाची माहिती ! सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ बदलली, ‘हा’ आहे नवीन ‘टायमिंग’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आघाडीचे सरकार आल्यावर मार्गी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासून केली जाणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर टीका देखील करण्यात आली तर सरकारमधील काही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे पगार पाच दिवसांप्रमाणे काढावेत असे म्हटले होते.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर सरकारी कार्यालयात लोकांना आणखी खेटे मारावे लागतील, असा सूर उमटला होता. मात्र, पाच दिवसांचा आठवडा करताना सरकारनं कामाचा वेळ वाढवला आहे. त्यामुळे नागरिकांना सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सरकारी कार्यालये उघडी राहणार आहेत.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात यासंदर्भातील संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सकाळी 9.45 वाजता कार्यालये सुरु होणार असून सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. शिपायांसाठी वेगळी कार्यालयीन वेळ आहे. शिपायांना 9.30 वाजता कार्यालयात हजर रहावे लागणार असून 6.30 पर्यंत कार्यालयात थांबे लागणार आहे.

शासकीय कार्यालयाचे नवीन वेळापत्रक

– 29 फेब्रुवारी 2020 पासून शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा, सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असतील.

– सर्व शासकीय कार्यालयाच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वढविण्यात आली. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी कार्यालयीन वेळ असेल.

– सर्व शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 अशी कार्यालयीन वेळ असेल.

– सर्व शासकीय कार्यालयात दुपारी 1 ते 2 या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची जेवणाची सुट्टी असेल.

यांना नियम लागू नाही

औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात. अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार इ. यांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत. अशा प्रकारच्या कार्यालयांची यादीही सरकारने दिली आहे. या यादीत दिलेल्या प्रकारात मोडणाऱ्या इतर कार्यालयांनासुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही.