दुर्दैवी ! अवघ्या 5 दिवसांवर मुलाचे लग्न, पत्रिका देण्यासाठी गेलेल्या आई- वडिलांचा अपघाती मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या पाच दिवसांवर आलेल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या आई- वडिलांवर काळाने घाला घातला. भऱधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी फाट्याजवळ शुक्रवारी (दि.2) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार दाम्पत्याच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे त्यांचे मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना अक्षरश: खोऱ्याचा वापर करावा लागला. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

संजय पूनमसिंग छानवाल (51) आणि मीना संजय छानवाल (46, दोघे. रा. परसोडा, ता. वैजापूर) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा लहान मुलगा गणेशचा विवाह औरंगाबाद तालुक्यातील शामवाडी येथे 7 एप्रिल रोजी आयोजित केला होता. त्याचे रीतसर निमंत्रण नातेवाइकांना देण्यासाठी ते दुचाकीवरून राजेवाडी येथे निघाले होते. मात्र, धुळे-सोलापूर महामार्गावर काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाखालून जात असताना समोरून भरधाव येणा-या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली.

यात ते ट्रकच्या समोरच्या चाकाखाली आले. ट्रकने त्यांना काही फूट फरपटत नेल्याने त्यांच्या शरीरांचा चेंदामेंदा झाला होता. संजय आणि मीना छानवाल यांनी घरून निघताना राजेवाडी येथे रात्री मुक्काम करू आणि उद्या शनिवारी दुपारपर्यंत घरी परत येऊ, असे मुलगी राधा आणि नवरदेव गणेश यांना सांगितले होते. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.