धुळ्यात बंजारा जातपंचायतीकडून 5 कुटुंबे बहिष्कृत, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पंचांवर अखेर FIR

पोलिसनामा ऑनलाईन – धुळे तालुक्यातील खोरदड तांडा येथील बंजारा जातपंचायतीच्या पंचांनी समाजबांधव दीपक सोमा राठोड यांच्या कुटुंबासह पाच कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केल्याने हे पाचही कुटुंब गावाबाहेर राहत आहेत. त्यामुळे राठोड यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून ट्वीट करुन न्याय देण्याची विनंती केली होती. गृहखात्याने या ट्वीटची दखल घेत पोलीस अधीक्षकांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.

खोरदड तांडा गावातील बंजारा जातपंचायतीच्या पंचांनी पाच पीडित कुटुंबांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरु न देणे, गावात किराणा, औषधे खरेदी करु न देणे, पिठाच्या गिरणीवर येऊ न देणे, समाजातील लग्न, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधी यात हजर राहू न देणे, मुला-मुलींचे लग्न जमू न देणे, पीडित कुटुंबांना खोरदड तांड्यातील त्यांच्या घरांमध्ये राहू न देणे अशा प्रकारे जाच केल्याची व्यथा दीपक राठोड यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मांडली होती. 14 सप्टेंबर 2019 ते 28 मे 2020 पर्यंत हा छळ करण्यात आला होता. विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला दीपक राठोड याचे वडील सोमा राठोड यांनी जामीन दिला होता. याचा राग जातपंचायत सदस्यांना आला, त्यातून त्यांनी समाजातून बहिष्कृत केल्याची राठोड याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांपुढे कथन केले होते.