दुर्दैवी ! पाझर तलावात बुडून एकाच कुटुंबातील 5 मुलींचा मृत्यू

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – भोकरदन तालुक्यातील तळेगाववाडी येथील पाझर तलावाजवळ खेळत असलेल्या पाच मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.23) सायंकाळी उघडकीस आली. मृत्यूमुखी पडलेल्या पाचही मुली एकाच घरातील असून 5 ते 7 वयोगटातील आहेत. या घटनेमुळे तळेगाववाडी गावावर शोककळा पसरली आहे.

भोकरदन तालुक्यातील तळेगाववाडी या गावातील मुली पाझर तलावाजवळ खेळत होत्या. दरम्यान 5 मुलींचा या पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. आशुबी पठाण (वय-6), नबीबाबी पठाण (वय-6), अल्फीदाबी पठाण (वय-7), सानियाबी पठाण (वय-6) आणि शब्बुबी पठाण (वय-5) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. या मुली खेळताना पाझर तलावात पडल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किंवा त्या पोहण्यासाठी गेल्या असाव्यात आणि पोहता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुली पाण्यात बुडत असताना सहाव्या मुलीने या घटनेची माहिती वस्तीवर जाऊन दिली. नागरिकांनी तात्काळ तलावाकडे धाव घेतली. पाचही मुलींना अत्यावस्थ अवस्थेत तलावाच्या बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी तात्काळ फुलंब्री येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच पाचही मुलींचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. एकाचवेळी या पाच अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर दु:खाचं सावट पसरलं आहे.