पदकांची ‘सुवर्णपंचमी’ घालणार्‍या हिमा दासचे जाहिरात शुल्कात झाली ‘इतकी’ वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केवळ २० दिवसात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या १९ वर्षाची धावपटू हिमा दास हिची चर्चा संपूर्ण देशात सुरु झाली. असा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय धावपटू असल्याने तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येऊ लागला आहे. त्यामुळे या महिन्यातील पाचवे सुवर्ण पदक जिंकल्यानंतर हिमा दास हिचे जाहिरात शुल्क तब्बल दुप्पट झाले आहे.

हिमाच्या जाहिरातींचे काम आयओएस ही एजन्सी पाहते. या एजन्सीने हिमाचे जाहिरात शुल्क ३० लाखावरून ६० लाख केले आहे. लवकरच ती स्टेट बँक ऑफ इंडिया, एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस, आदिदास, स्टार सिमेंट याशिवाय स्फूर्तीदायक पेये, खाद्यतेल इत्यादींच्या जाहिरातीमधूनही दिसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे हिमाने आपल्या उत्पन्नाचा काही भाग तिचे राज्य असलेल्या आसाममधील पूरग्रस्तांसाठी दान केला आहे.

क्रिकेटपटूंना एखाद्या जाहिरातीत काम करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची रास ओतायला कंपन्या तयार असतात. पण, त्यामानाने इतर क्रीडा प्रकारातील खेळाडुंकडे ते दुर्लक्ष करतात. गेल्या काही वर्षापासून इतर खेळातील खेळाडुही आता जाहिरातींमधून झळकु लागले आहेत. या खेळाडुंना त्यातून उत्पनाचा चांगला स्त्रोत उपलब्ध झाला तर पालकही मुलांना क्रिकेट सोडून अन्य खेळामध्ये करीअर करण्यास प्रोत्साहन देतील.

आरोग्यविषयक वृत्त –