IAS Transfer : राज्यातील 5 IAS अधिकार्‍यांच्या बदल्या, शिर्डी संस्थानच्या CEO पदी बगाटे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे संकट असताना राज्य सरकारनं आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यामध्ये पुणे जिल्हाधिकारीपदावर कोणाचीच निवड करण्यात आली नसल्याने अद्यापही हे पद रिक्तच आहे. आज बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच जिल्हाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिर्डी येथील साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापीकय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुख्य सचिवांच्या कार्यालयात उप सचिवपदी बदली करण्यात आली आहे. जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक ए.ए. गुल्हाणे यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. शिर्डी येथील साई संस्थानच्या सीईओपदी सरकारकडून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती नाही ?
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली झाल्याने हे पद रिक्त आहे. सध्या पदाचा अतिरिक्त पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे दिला आहे. आज राज्य सरकारकडून पुणे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती होईल असे वाटले होते. मात्र, बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यापैकी कोणाचीही नियुक्ती पुणे जिल्हाधिकारी पदावर करण्यात आलेली नाही.