बिबट्याच्या ५ बछड्यांचा आगीत होरपळून मृत्यू

मंचर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथे तब्बल पाच बिबट्याचे बछडे आगीत होरपळून मृत्यू पावले आहेत. उसाच्या शेताला लावलेल्या आगीमुळे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक गावातील गुणगे-शेटेमळा येथे एका शेतात ऊस तोडणी चालू होती. उसाच्या शेतात साप दिसल्यानंतर शेत पेटवून देण्यात आले. या आगीत बिबट्याच्या ५ बछड्यांसह एका सापाचाही होरपळून मृत्यू आला आहे. दरम्यान घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी वनविभाग दाखल झाले आहे.

आंबेगाव परिसरात बिबट्याचा वावर
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचा वावर नेहमीचाच झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंबमध्ये जानेवारी महिन्यात चार दिवसात तीन बिबटयांना जेरबंद करण्यात आले होते. तसेच २५ मार्च रोजी बिबट्याच्या हल्ल्यात आंबेगाव तालुक्यातच साकोरे येथील श्रुतिका महेंद्र थिटे (वय ६) ही मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्यांचे हल्ले, अपघातांचे सत्र पाहता आंबेगाव तालुक्यात अवसरी येथे बिबट्या निवारा केंद्र उभारण्याची मागणी होऊ लागली आहे.

बिबट्या मानवी वस्तीत येण्याची करणे
वनांचे घटणारे क्षेत्र आणि ऊस शेतीचे वाढणारे क्षेत्र हे या समस्येचे मूळ कारण आहे. त्यामुळे जंगलात वास्तव्य करणाऱ्या बिबट्याच्या अनेक पिढ्या उसातच स्थिरावल्या आहेत. परिणामी बिबट्याचा मानव वस्तीतील वावर वाढला असून भक्ष्यासाठी बिबट्याकडून पशुधनावर व पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत उत्तर पुणे जिल्यातील पश्चिमघाट, सह्याद्री डोंगररांगामध्ये लपायला जागा यामुळे बिबट्याची संख्या वाढली आहे.

Loading...
You might also like