धक्कादायक ! पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधील 5 नर्स ‘कोरोना’बाधित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांवर सलग दोन महिने उपचार करावे लागल्याने पुण्यातील नायडू रुग्णालयाती पाच परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनाच्या रुग्णावर उपचार करताना राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन प्रशासन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे 150 रुग्ण असून पालिकेच्या सेवेतील कायम आणि कंत्राटी सुमारे 35 तर, अन्य विभागांतून आलेल्या 35 परिचारिका सध्या या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामध्ये 57, 42, 38,36 आणि 35 वर्षाच्या पाच परिचारिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना नायडू हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले आहे. त्यामधील सोनावणे रुग्णालयातील एका परिचारिका या ठिकाणी होती. मात्र, त्यांना नुकतेच एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पाचही परिचारिकांची प्रकृती सुधारत आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार, कोरोनाच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टर यांना सात दिवस कोरोना वॉर्ड, सात दिवस नॉन कोरोना वॉर्ड आणि सात दिवस होम क्वारंटाईन करायचे. मात्र, राज्य सरकारच्या या आदेशाचे नायडू हॉस्पिटलकडून पालन होताना दिसत नसल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे. या बाबत त्यांनी रुग्णालय अधीक्षक डॉ. सुधीर पाटसुते यांना पत्र देखील पाठवले आहे. त्यात आम्ही 27 जानेवारीपासून सलग काम करती असल्याचे म्हटले आहे. आमच्यापैकी काही जणांना मधुमेह आणि रक्तदाबही आहे. त्यामुळे रोटेशन, सुट्या आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. सलग ड्युटी दिल्यामुळे आम्हाला कोरोना झाल्याचे परिचारिका यांनी एका मराठी पेपरशी बोलताना सांगितले.

राहण्याची व्यवस्था नाही
राज्य सरकारच्या आदेशानुसार, कोरोना रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांच्या राहण्याची व्यवस्था त्याच रुग्णालयाच्या आवारात किंवा नजीकच्या ठिकाणी करावी असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार रुग्णालयातील 12 डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था मागणी केल्यावर जुन्या विश्रामगृहातील चार खोल्यांमध्ये करण्यात आली. परंतु त्या ठिकाणी कोणतीही सुविधा नसल्याने डॉक्टरांनी त्या ठिकाणी रहाण्यास नकार दिला. सध्या या ठिकाणी फक्त एकच डॉक्टर रहात आहे. तसेच महापालिकेने काही हॉटेल्स ताब्यात घेतेली असून त्या ठिकाणी डॉक्टर आणि परिचारिकांची राहण्याची सोय करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, अद्याप कोणालाही हॉटेलमधील रुम मिळालेली नाही. त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांना ड्युटी संपल्यानंतर आपल्या घरी जावे लागत आहे.

वॉर्डात 30 रुग्ण आणि परिचारिका फक्त 3
कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या परिचारिकेने सांगितले की, मागील दोन महिन्यापासून आम्हाला ड्युटी देण्यात आली आहे. एका वॉर्डमध्ये 30 ते 36 रुग्ण असतात. या ठिकाणी कमीतकमी पाच परिचारिका असायला पाहिजेत. मात्र, या ठिकाणी दोन किंवा तीन परिचारिकांवरच याची जबाबदारी सोपवली जाते. त्यामुळे धावपळीत काही तरी चूक होते आणि ती भोगावी लागते.

घरमालकांनी घर सोडण्यास सांगितले
कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या तीन परिचारीका भाड्याने राहतात. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरमालकांनी त्यांना घर सोडण्यास सांगितले आहे. आम्ही सध्या घरी परतणार नाही असे सांगितले तरी घरमालकांनी घर सोडण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे आमची अडचण झाली आहे.

सरकार सांगते एक आणि घडते भलतेच
कोरोना हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिकांची राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना पिंपरी-चिंचवड, औंध, दिघी येथून ये-जा करावी लागते. प्रशासनाने अनेकांच्या वाहतुकीची व्यवस्था केलेली नाही. नोकरीची गरज असल्याने हे सहन करावे लागते. सरकार सांगते एक आणि येथे भलतेच घडतेय, असे एका अनुभवी परिचारिकेने सांगितले.

पुरेसे मनुष्यबळ नाही
या संदर्भात रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पाटसुते म्हणाले, कोरोना रुग्णंचा संख्या वाढत आहे. रोटेशन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ सध्यातरी उपलब्ध नाही. त्यामुळे ते शक्य नाही. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायचे असले तरी स्थानिक परिस्थितीनुसार त्या बाबत उपाययोजना करण्यात येतात.