वेगवेगळया फटाक्यांमुळं दरवर्षी 5000 अंध !

नागपूर : पोलिसनामा ऑनलाइन – फटाक्यात चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात. या घटकांचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो.

फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते,अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी दिली. ते म्हणाले, फटाक्यांमुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाख असून,फटाक्यांचा धूर डोळे, फुफ्फुस व त्वचेला अपाय करतो. दमा व अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढते. डोळा लाल होणे, पाणी जाणे, डोळा दुखणे, अचानक डोळ्यांची नजर कमी होणे, उजेड सहन न होणे, डोके दुखणे, डोळ्यांत चिपड येणे, डोळे सुजणे असे दुष्परिणाम दिसू लागतात. त्यामुळे सर्वांनी फटाके वाजवताना काळजी घेणे आवश्यक आहे.

शक्यतो मोकळ्या जागेतच व मोठ्यांच्या देखरेखीखाली फटाके फोडावेत. सर्वांत जास्त धोका फटाके फोडताना पाहणाऱ्यांना असतो. कारण,स्फोटामुळे दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला तसेच इतर अवयवांना इजा होऊ शकते, असेही ते म्हणले.

डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण
भुईनळा ६० टक्के
सुतळी बॉम्ब ३० टक्के
चक्री आणि रॉकेट १० टक्के
इतर फटाके १० टक्के