जादा शुल्क आकारल्यास खासगी रुग्णालयांना 5 पट दंड !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना उपचारासाठी राज्य शासनाने नवे दर निश्चित केले आहेत. त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन करून खासगी रुग्णालयांत जादा दर आकारल्यास संबंधितांना पाच पट दंड ठोठावणे, त्यांचे परवाने रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसणार आहे.

विदर्भातील कोरोनाबाधितांचा आढावा घेण्यासाठी टोपे नागपुरात असताना त्यांनी ही माहिती दिली आहे. खासगी रुग्णालयांवर नियंत्रणासह महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेबद्दल राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना अधिकार दिले आहेत. जर खासगी रुग्णालय रुग्णांकडून शासनाने निश्चित केल्याहून जास्त दर आकारत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांनी रुग्णालयांनाही भेटी दिल्या पाहिजे. सद्यस्थितीत राज्यात प्रतिदशलक्ष 40 हजार चाचण्या होत आहेत. चाचण्या वाढवल्याने कोरोना रुग्ण वाढत असून मृत्यू वाढू नये यासाठी संबंधितांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑक्सिजन खाटा वाढवणे आवश्यक असल्याचेही टोपे यांनी सांगितले आहे.