सोशल मिडियावर फेक न्यूज पसरवल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास, १० लाखाचा दंड ; ‘या’ देशाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंकेत साखळी बॉम्ब स्फोटानंतर जातीय दंगल उसळल्या होत्या. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या काही आक्षेपार्ह मजकुर या घटनेला कारणीभूत ठरला होत. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी श्रीलंका सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सोशल मिडियावरील व्हायरल झालेल्या फेक न्यूज आणि मजकूरमुळे देशातील परिस्थिती दुषित झाल्याने श्रीलंका सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. श्रीलंकेत खोटी माहिती पसरवणाऱ्या आणि द्वेष निर्माण करणाऱ्यांना दोषी ठरवून ५ वर्षांचा तुरुंगवास किंवा १० लाखाचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते.

असे असले तरी सरकारने अजून देखील ह्या दोन्ही अपराधांची वेगवेगळी परिभाषा केलेली नाही. असे सांगण्यात येत आहे की, लवकरच दंड संहितेत संशोधन करून दोन्ही गुन्ह्यांसाठी वेगवेगळी शिक्षा ठरवण्यात येईल.

२१ एप्रिलला झालेल्या श्रीलंकेतील साखळी बॉम्ब स्फोटानंतर सोशल मिडियाच्या अयोग्य वापरामुळे वातारण दुषित होण्यास मदत झाली आणि त्यातून द्वेषाच्या भावनेतून श्रीलंकेतील लोकांनी मुसलमान लोकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की सोशल मिडियावर कोणतेही नियंत्रण नसल्याने द्वेषाच्या भावना निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत राहिल्या आणि त्यातून धार्मिक दंगली पेटल्या. या सगळ्या परिस्थितीला सोशल मिडिया कारणीभूत ठरला. हे लक्षात आल्यावर तेथील सरकारने सोशल मिडियाच्या वापरावर तब्बल 9 दिवस बंधन आणले होते.

अजून देखील श्रीलंकेतील परिस्थिती सुधारली नसून असे प्रकार पुन्हा घडू नये याची खबरदारी बाळगत श्रीलंका सरकारने सोशल मिडियाच्या वापराबाबत कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे.