पुणे पोलीस आयुक्तालयात पाच झोन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची कामकाज १५ आॅगस्टपासून स्वतंत्रपणे सुरु झाले असून त्यामुळे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता पुणे पोलीस आयुक्तालयात पाच परिमंडळे असणार असून प्रत्येक परिमंडळात सहा पोलीस ठाणे असतील, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली.

पुणे शहराचा विस्तार वाढत गेला. त्यामुळे गेल्या १० वर्षात अनेक नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्यात आली असली तरी परिमंडळात बदल न केल्याने काही परिमंडळामध्य अधिक पोलीस ठाणी तर काहींमध्ये कमी असा फरक पडत होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आल्याने शहरातील पिंपरी चिंचवड परिसरातील पोलीस ठाणी नव्या पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरीत करण्यात आली. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तालयातही फेरबदल करणे आवश्यक ठरले होते. पोलिस आयुक्तालयात पाच परिमंडळे निर्माण करण्यात आली आहेत. या परिमंडळांमध्ये प्रत्येकी सहा पोलिस ठाणी असणार आहेत. पूर्वी दक्षिण व उत्तर असे दोन भाग करण्यात आले होते. त्या ऐवजी शहराची  पूर्व व पश्चिम अशी विभागणी करण्यात आली असून पश्चिम प्रादेशिक विभागात परिमंडळ १, २ आणि ३ असणार असून पूर्व प्रादेशिक विभागात परिमंडळ ३ व ४ असेल.

परकिय नागरिक विभागाचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्याकडे परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.  गुन्हे शाखा युनिट ५  किंवा वाहतुक विभाग मगरपट्टा या इमारतीमध्ये परिमंडळ पाच उपायुक्त यांचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडचा परिसर हा परिमंडळ तीन मध्ये येत होते. आता नव्याने परिमंडळ तीन अस्तित्वात येत असून त्यासाठी नव्या जागेचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्तांचे कार्यालय नवीन जागा मिळेपर्यंत तात्पुरते फरासखाना पोलिस  ठाण्याच्या इमारतीत असणार आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि पुणे शहर पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त पद्मनाभन आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुणे शहर आयुक्तालयात बैठक पार पडली. त्यामध्ये नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासंदर्भात मनुष्यबळ, कार्यालय आदीबाबत चर्चा करण्यात आली.

पिंपरी चिंचवडला हस्तांतरीत करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यात यापूर्वी जी वाहने होती. ती तशीच ठेवण्यात आली आहे. तेथील नवीन वाहने परत मागविली आणि इतर ठिकाणची जुनी वाहने दिली असा काही प्रकार झालेला नाही, असे यावेळी सांगण्यात आले.

शहरातील १ हजार ५१७ अधिकारी कर्मचारी नव्याने अस्तित्वात आलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हस्तांतरीत करण्यात आला आहे.

पिंपरीतील आधी कार्यरत असलेले १ उपायुक्त,१ सहायक आयुक्त, २६ पोलिस   निरीक्षक, १८ सहायक निरीक्षक, ६७ उपनिरीक्षक, ११५ सहायक फौजदार, ३६१ हवालदार, ४२५ पोलिस नाईक आणि ६१६ पोलिस शिपाई वर्ग करण्यात आले असून अद्याप दोनशे पोलिस कर्मचारी प्रतिक्षेत आहेत. मात्र, त्याबदल्यात गार्ड, एस्कॉर्ट, कैदी पार्टी, खासदार, आमदार संरक्षण, आरसीपी, व्हीआयपी दौरे आदीसाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. असे प्रशासन पोलिस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले.

अशी असेल परिमंडळ निहाय रचना

पश्चिम प्रादेशिक विभाग

परिमंडळ १: समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक, डेक्कन आणि शिवाजीनगर

परिमंडळ २: सहकारनगर, स्वारगेट, भारती विद्यापीठ, बंडगार्डन, लष्कर, कोरेगाव पार्क

परिमंडळ ३: कोथरूड वारजे माळवाडी, उत्तमनगर, दत्तवाडी, सिंहगड रोड, अलंकार

पूर्व प्रादेशिक विभाग

परिमंडळ ४ : खडकी, विश्रांतवाडी, चतु:श्रृंगी, चंदननगर, येरवडा, विमानतळ  आणि लोणीकंद (प्रस्तावित)

परिमंडळ ५ : हडपसर,मुंढवा, कोंढवा,बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणीकाळभोर (प्रस्तावित)